टुनकी बु येथे जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी….
संत तुकाराम महाराज सेवाभावी ट्रस्ट , कुणबी कार्मचारी सेवा संघ ,संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समिती टुनकी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य शोभायात्रा सोहळा..

(प्रभुदास पारस्कार) :-
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . संत शिरोमणी तुकाराम महाराज जयंती (माघ शुद्ध पंचमी) हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत पवित्र उत्सव आहे, जो सहसा फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो .समाजसुधारक संत तुकोबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू येथे झाला. त्यांच्या अभंगवाणीने समाजाला समतेचा व भक्तीचा मार्ग दाखवला या थोर संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात . त्याअनुषंगाने संत शिरोमणी तुकाराम महाराज जयंतीनिमित्त टुनकी नगरी मध्ये भक्ती , श्रद्धा आणि आनंद उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडले . संत तुकाराम महाराज सेवाभावी ट्रस्ट ,कुणबी कर्मचारी सेवा संघ ,संत तुकाराम महाराज जयंती सोहळा समिती टुनकी बु व टुनकी खुर्द यांच्या संयुक्तपणे आयोजित भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण टुनकी नगर भक्तीमय सागरात न्हाऊन निघाले . श्री दत्त मंदिर येथुन भव्य शोभायात्रा सोहळ्याची जय्यत तयारीनिशी मोठ् उत्साहात सुरुवात झाली . संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर भव्य दिव्य शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली . संत तुकोबाराय व श्री विठ्ठल नामाच्या जयघोषाने टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग कीर्तनाच्या निनादात भव्य शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली ठिकठिकाणी महिला भगिनींनी घरासमोर रांगोळ्या दिवे लावत शोभायात्रेची पूजाअर्चा करून वारकऱ्यांचे उस्फुर्त स्वागत केले . या भव्य दिव्य शोभायात्रेत वारकरी संप्रदायातील भाविक ,विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक, टाळकरी भजनी महिला मंडळ,टाळकरी भजनी पुरुष मंडळ ,ढोल (झ्यांगड) भजनी मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
आकर्षक शोभायात्रा , श्री विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा , संत तुकाराम महाराज पारंपारिक वेशभूषा धारण केलेल्या देखावे मुलं लक्ष वेधून घेत होते .
संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रचार करत समाजात एकता सदभावना आणि भक्तीचा संदेश देण्यात आला . सदर शोभायात्रा दिंडी सोहळा श्री दत्त मंदीर येथे पोहोचल्यानंतर सामूहिकपणे महाआरती घेऊन दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी गाव परीसरातील महिला भगिनी , लहान थोर नागरिकांनी सहभागी होत उस्फुर्त प्रतिसादाने शोभयात्रा सोहळा यशस्वीरित्या पार पडला .सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संत तुकाराम महाराज सेवाभावी ट्रस्ट , कुणबी कार्मचारी सेवा संघ ,संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समिती टुनकी तसेच ठाणेदार संदीप काळे ,टुनकी बिटचे पोहेकॉ विनोद वानखडे ,पोलीस कर्मचारी तथा समस्त गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .





