दुःखातून दिव्याचा प्रकाश; निवृत्त शिक्षकांच्या तेरवीचा खर्च बनला गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती…
व्यक्ति जाते,सत्कार्य राहते ; तेरवीचा खर्च टाळून थारकर कुटुंबीयांचा समाजासमोर आदर्श उपक्रम

युवा महाराष्ट्र11 न्यूज
(प्रभुदास पारस्कार)
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या तेरावी कार्यक्रमाचा हजारो रुपयांचा खर्च टाळून धारकर कुटुंबाने आपल्या वडिलांच्या स्मृतीला शिक्षणाचा दीप लावून खरी श्रद्धांजली वाहिली आहे. यांचा हा निर्णय आज संपूर्ण समाजासाठी आदर्श आणि अनुकरणाचा विषय ठरला आहे.
‘मरावे तरी कीर्ती रूपे उरावे’ या उक्तीला सार्थ ठरवत दुःखाच्या प्रसंगाचे रूपांतर समाजोपयोगी कार्य करण्याचा हृदयस्पर्शी आणि आदर्श उपक्रम सोनाळा येथे राबविण्यात आला आहे.
सेवानिवृत्त शिक्षक स्व.दिगंबर उत्तम थारकर (रा. मुंढगाव, ह.मु. सोनाळा) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. श्री संत सोनाजी महाराज हायस्कूल, सोनाळा येथे त्यांनी अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले होते. वडिलांच्या जाण्याने थारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, मात्र या दुःखातच त्यांनी समाजाला नवी दिशा देणारा विचार केला.
दुःख पचवत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी तेरवीच्या कार्यक्रमावर होणारा अनावश्यक, अवाजवी खर्च टाळून तोच निधी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी वापरण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे .
स्व.दिगंबर थारकर यांची स्मृती चिरंतन रहावी आणि त्यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात केलेल्या सेवेला खऱ्या अर्थाने आदरांजली मिळावी, या उदात्त भावनेतून त्यांचे चिरंजीव श्री.संजय दिगंबर थारकर आणि श्री. सोनाजी दिगंबर थारकर, शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टुनकी बु यांनी
तेरवीचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेत या प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात करत तेरवी कार्यक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च श्री संत सोनाजी महाराज हायस्कूल, सोनाळा यांच्या खात्यामध्ये कायम ठेव (Fixed Deposit) स्वरूपात जमा करण्यात येणार असून या ठेवीतून दर वर्षातून मिळणाऱ्या व्याज दर मिळकतीची रक्कम दरवर्षी इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याला स्व.दिगंबर थारकर यांच्या नावाने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात निधी देण्यात येणार आहे.
म्हणजे एका वर्षाचा खर्च नाही, तर पिढ्यानपिढ्या दरवर्षी एका हुशार विद्यार्थ्याचे शिक्षण या निधीतून बळ घेणार आहे .
या उपक्रमामुळे दरवर्षी एका गरीब व गुणवंत विद्यार्थ्याला शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक मदत लाभणार असून, शिक्षणाची नवी प्रेरणाही मिळणार आहे.
गावोगावी तेरवी, दशक्रिया यावर अवास्तव खर्च करून कर्जबाजारी होण्याच्या घटना घडत असताना, थारकर कुटुंबाने शिक्षक असलेल्या वडिलांच्या संस्काराला साजेसा असा व सकारात्मक भावनेतून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. एका कुटुंबाच्या दुःखातून निर्माण झालेली ही सकारात्मक भावना आज अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारी ठरणार आहे.
आजच्या काळात एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, त्या खर्चाला विधायक दिशा देत ‘व्यक्ती जाते, पण त्यांचे ‘सत्कार्य सदैव जिवंत राहते’ स्व.दिगंबर थारकर यांनी हयातीत ज्या शाळेत शिकवले, त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत मिळणार असल्याने ही भावनिक आणि औचित्यपूर्ण निर्णय ठरला आहे.
याचा प्रत्यय थारकर कुटुंबीयांनी या उपक्रमातून दिला आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना शिक्षण क्षेत्राशी एकरूप झाले होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी मदत उपलब्ध करून देण्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या कार्याला सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजातील इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनावश्यक खर्च टाळत शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक कार्यासाठी निधी देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्व.दिगंबर थारकर यांच्या स्मृतींना हीच खरी आदरांजली ठरावी, तसेच त्यांच्या नावाने मिळणारी शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ देत राहावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने थारकर कुटुंबीयांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.



