मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरात दुर्गम भागातील आदिवासी बांधवाना आरोग्य सुविधांचा लाभ…

युवा महाराष्ट्र11 न्युज (प्रभुदास पारस्कार)
संग्रामपूर तालुक्यातील आरोग्य केंद्र, वसाळी येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा त्यांच्या जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध वैद्यकीय तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ या शिबिराद्वारे मिळाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी हे शिबिर विशेषतः उपयुक्त व महत्त्वाचे ठरले.
शिबिराच्या आयोजनासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. संजय कुटे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष श्री. सचिन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यास मदत झाली.
सदर शिबिरामध्ये समर्पण हॉस्पिटल, वत्सल हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, नुरॉन हॉस्पिटल, सोलार हॉस्पिटल आणि मेडिकेअर हॉस्पिटल अकोला या रुग्णालयांचा सहभाग होता. विविध तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय पथकांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय समन्वयक श्री. सुनील रामदास सुरत्ने यांनी उपस्थित आशा सेविकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ कसा मिळवून देता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच संबंधित वैद्यकीय पथकांनी मोलाचे परिश्रम घेतले.



