शैक्षणिक

जिल्हा परिषद सोनाजी नगर च्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगला बालआनंद मेळावा

बालआनंद मेळाव्याने शाळा दणाणली! खेळ, कला आणि संस्कारांचा उत्सव अनुभवला

सतिशकुमार वानखडे   

 विद्यार्थ्यांच्या आनंदाला उसळी देणारा आणि संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाची लाट उसळवणारा बालआनंद मेळावा मोठ्या दिमाखात पार पडला. रंगीबेरंगी सजावट, शिस्तबद्ध नियोजन आणि बालकेंद्रित उपक्रमांमुळे शाळेचे वातावरण अक्षरशः जिवंत झाले होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, चित्रकला, हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बौद्धिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्यात आले. बालचिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचे मनमोकळेपणाने सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या आणि संस्कारांचे प्रतीक असलेल्या सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुमेध भाऊ दामधर, केंद्रप्रमुख भीमराव वानखडे सर तसेच जिल्हा परिषद पिंगळी बुद्रुक शाळा चे मुख्याध्यापक गणेश जामनेकर सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचे समाधान आणि शिक्षकांचा उत्साह यामुळे हा मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता बालमन घडविण्याचा संस्कारक्षम उत्सव ठरला. शाळा व्यवस्थापन व शिक्षकवर्गाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमेध भाऊ दामधर, केंद्रप्रमुख भीमराव वानखडे सर, मुख्याध्यापक गणेश जामनेकर सर तसेच वरिष्ठ शिक्षक भगवान बावणे सर यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या व्यवसाय स्टॉलला भेट देऊन खरेदी केली. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची प्रत्यक्ष ओळख झाली.
कार्यक्रमाला शाळेचे शिपाई गोरखनाथ डांगे, पालक वर्ग, महिला वर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद हा संदेश देत बालआनंद मेळाव्याने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close