
-
- सतिशकुमार वानखडे (संपादकीय वार्ता ). सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल सोनाळा ग्रामपंचायतमध्ये नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामसभा मात्र अद्यापही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावातील अनेक नागरिकांनी पाणीटंचाई, रस्ते, स्वच्छता तसेच इतर विकासकामांबाबत लेखी अर्ज व निवेदने दिली आहेत. तसेच ग्रामसभेमध्ये विषय मांडण्यासाठी अर्ज सादर करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी लेखी निवेदन पंचायत समिती ला दिले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 7 नुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना 1 मे 2026 ची ग्रामसभा अद्याप झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे लोकशाही हक्क डावलले जात असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता, वाढत्या समस्या आणि ग्रामसभा न घेण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी. तसेच ग्रामसभा घेण्यास झालेल्या विलंबासाठी जबाबदार असलेल्या ग्रामसेविका शुभांगी धोटकर व प्रशासक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“ग्रामसभा हे गावाच्या विकासाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. तेच व्यासपीठ बंद ठेवून नागरिकांचे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामसभा तात्काळ आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



