सामाजिक

सोनाळा ग्रामपंचायत चालते “रिमोट वाले बाबा” यांच्या इशाऱ्यावर…

अखेर हे रिमोट सोनाळ्यात कोणाजवळ या चर्चेला उद्यान......

सतिश वानखडे (संग्रामपूर प्रतिनिधी)

सोनाळा (प्रतिनिधी)

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल सोनाळा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या “रिमोट वाले बाबा” यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याची चर्चा गावात मोठ्या प्रमाणात रंगत आहे. गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीतील अनेक निर्णय हे काही विशिष्ट व्यक्तींच्या सांगण्यावर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

गावकऱ्यांच्या मते, ग्रामपंचायतमध्ये कोण सरपंच होणार, कोणता अधिकारी गावात राहणार, कोणाला काम मिळणार आणि कोणाला पद द्यायचे हे सर्व निर्णय काही “रिमोट वाले बाबा” आपल्या गाडीत बसून ठरवत असल्याचे चित्र आहे. ग्रामसेवक असो किंवा सरपंच, सर्वजण या कथित “रिमोट सिस्टम”नुसारच काम करत असल्याची चर्चा गल्लीबोळात सुरू आहे.

दरम्यान, सोनाळा ग्रामपंचायतीतील कथित नियमबाह्य पदभरती प्रकरणातही मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप होत आहे. गेल्या वर्षभरापासून विशिष्ट लोकांना पदे देण्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनाही याची पूर्ण माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.

काही सदस्यांकडून मासिक बैठकीच्या नावाखाली सह्या घेण्यात आल्याचा आरोप असून, अनेकांना ठरावाचा खरा विषयच माहिती नव्हता, असे बोलले जात आहे. काही सदस्यांना भत्ता देण्यात आला तर काहींना अद्याप मिळालाच नसल्याने नाराजी वाढली आहे.

या प्रकरणात चौकशी अधिकारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तक्रारदारांकडूनच वारंवार जबाब घेतले जात असून अद्याप कोणत्याही तक्रारीचा अंतिम निष्कर्ष लावण्यात आलेला नाही. त्यामुळे चौकशी अधिकारी हे आरोपींना पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गावात अशीही चर्चा सुरू आहे की, “रिमोट वाले बाबा” यांचा प्रभाव चौकशी प्रक्रियेवरही पडत असून चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. यामुळे निष्पक्ष चौकशी होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी घरकुल प्रकरणात उपोषण करूनही चौकशी झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक तक्रारी प्रलंबित असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

दरम्यान, “चौकशी अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी” अशी मागणी आता जोर धरत असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सोनाळा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close