सोनाळा कन्येची वैद्यकीय क्षेत्रात भरारी ; डॉ. अस्मिता वानखडे हिचा भव्य नागरी सत्कार
डॉ. अस्मिता वानखडे यांचा त्यांच्या जन्मदिनी सत्कार ......

सतिश वानखडे (सोनाळा (प्रतिनिधी) :
तालुक्यातील सोनाळा (जि. बुलढाणा) येथील रहिवासी डॉ. कु. अस्मिता भीमराव वानखडे हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), नागपूर येथून एमबीबीएस (MBBS) ही वैद्यकीय पदवी यशस्वीरित्या संपादन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या व समाजबांधवांच्या वतीने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
दिनांक २६ मे २०२६ रोजी सोनाळा येथील संविधान चौकात आयोजित या गौरव सोहळ्याची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगती करीत असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. अस्मिताच्या या यशाबद्दल परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ॲड. आयुष्मान घाटे साहेब, आयु. किशोर बढे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, संग्रामपूर), आयु. आशिषभाऊ धुंदळे (युवक आघाडी तालुकाध्यक्ष, वंबआ), श्री. सतीशभाऊ वानखडे (सामाजिक कार्यकर्ते, सोनाळा तथा पुण्यनगरीचे पत्रकार व सचिव – तालुका पत्रकार संघ), आयु. मिलिंदभाऊ वानखडे (तालुकाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, संग्रामपूर), सुजितदादा बांगर (फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे अभ्यासक), तथागत अंभोरे (समाजभूषण पुरस्कार प्राप्त), तसेच श्री. विठ्ठलभाऊ महाले (अध्यक्ष, अनाथ गरजू संघटना, सोनाळा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
“डॉ. अस्मिताने मिळवलेले हे यश संपूर्ण सोनाळा परिसरासाठी अभिमानास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आयु. निलेश तायडे सर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अस्मिताचे वडील आयु. भीमराव वानखडे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ व समाजबांधवांचे आभार मानले.
या गौरव सोहळ्यास परिसरातील नागरिक, युवक-युवती तसेच बौद्ध समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



