विदेश

बेबी पंचला अखेर आईचा आधार; चिमुकल्या माकडाचा व्हिडीओ व्हायरल

पंच चा व्हिडीओ व्हायरल, पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी.

  सतीशकुमार वानखडे ( बुलढाणा प्रतिनिधी )

जपानमधील एका चिमुकल्या माकडाची हृदयस्पर्शी कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ‘पंच’ नावाचं अवघं सात महिन्यांचं माकड Japan मधील Ichikawa City Zoological and Botanical Gardens येथे आहे. जन्मानंतर कुटुंबीयांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिल्याने पंच एकटाच पडला होता. अगदी त्याच्या आईनेही त्याला दूर झटकले होते.
लहान वयातच नाकारलं गेल्यामुळे पंचची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्याच्या वयाच्या इतर माकडांकडून त्याला त्रास दिला जात होता. मदतीसाठी तो वयोवृद्ध माकडांकडे गेला तरी त्याला पळवून लावलं जात होतं. त्यामुळे तो पूर्णपणे एकाकी झाला होता.
पंचची मानसिक अवस्था पाहून प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला खेळण्यासाठी ओरांगुटानचा बाहुला दिला. त्या बाहुल्यालाच तो दिवसभर कवटाळून बसायचा. जणू संपूर्ण जगात त्याचा एकमेव आधार तोच होता. त्याचे हे भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि जगभरातील नेटकऱ्यांनी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
       मात्र या कहाणीला आता आनंदाचा शेवट मिळाला आहे. माकडांच्या एका नव्या टोळीनं पंचला स्वीकारलं असून एका माकडीनं त्याला स्वतःचं पिल्लू मानलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या नव्या व्हिडीओमध्ये पंच आपल्या नव्या आईला शांतपणे मिठी मारताना दिसत आहे. हा भावनिक क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
हा व्हिडीओ @dondawastaken या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत तब्बल २४ लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत पंचच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एकाकीपणातून आईच्या मायेपर्यंतचा पंचचा हा प्रवास सध्या जगभरातील लोकांच्या मनाला स्पर्श करत आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close