पंचशील नगर मधील नागरिकांना फिरावे लागते… न्याय न मिळाल्यास आंदोलन
पंचशील नगर रहिवाशांचे निवेदन; शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी

पंचशील नगर रहिवाशांचे निवेदन; शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी
सतीश वानखडे ( संग्रामपुर प्रतिनिधी )
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पंचशील नगर परिसरातील रहिवाशांनी शासन निर्णय मार्च 2026 नुसार घरांच्या जागांचे नियमन व नियमितीकरण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पंचशील नगर परिसरात अनेक कुटुंबे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार त्यांच्या घरांचे नियमितीकरण अद्याप झालेले नाही. यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत असून, मूलभूत सुविधा मिळण्यातही अडथळे निर्माण होत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शासन निर्णय अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ तपासणी करून पुढील 10 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
तसेच, वेळेत निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण किंवा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन आकाश उत्तम वानखडे (प्रहार सेवक) यांनी पंचशील नगर रहिवाशांच्या वतीने दिले असून, जिल्हाधिकारी, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आदी विविध अधिकाऱ्यांना प्रत पाठविण्यात आली आहे.
सध्या या निवेदनामुळे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



