Uncategorized

वसाडी आरोग्य केंन्द्रातील औषधी परस्पर नियमबाह्य जाळली..

👉दोन शिपाईच कर्तव्यावर आदिवासींच्या आरोग्याशी खेळ ; आरोग्य अधिकारी म्हणतात ती औषधी मुदतबाह्य

प्रभुदास पारस्कार :-
संग्रामपूर तालुक्यातील वसाडी या आदिवासी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मनमानी कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. 16 डिसेंबरला केवळ दोनच शिपाई कर्तव्यावर हजर असल्याचे आढळले. विशेष म्हणजे या केंद्रातील मोठ्या प्रमाणावर औषधी जाळल्याचाही प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी जाळलेली औषधी मुदतबाह्य असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचे सांगितले. औषध विल्हेवाट प्रक्रियेचे पालन केले नसल्याचेही चौकशीत समोर आल्याने दोषींवर कारवाई केली जाईल, असेही आरोग्य अधिकारी डॉ गीते यांनी सांगितले.
संग्रामपूर हा आदिवासीबहुल तालुका असून ग्राम वसाडी सातपुड्यातील अंबाबरवा अभयारण्याच्या पायथ्याशी आहे. आदिवासींच्या आरोग्य सुविधेसाठी वसाडी येथे भव्य इमारत उभारून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे चालतो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. डॉक्टर व कर्मचारी हजर राहात नसल्याचीही ओरड नेहमीच होते. या आरोग्य केंद्राच्या परिसरातच रुग्णांना दिल्या जाणारी औषधी जाळल्याचा प्रकार समोर आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि चौकशीची सुत्रे हलविण्यात आली. संग्रामपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर मारोडे यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. केलेल्या प्राथमिक चौकशीत जाळलेल्या औषधी मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच शासकीय औषधींची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचेही या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले. वसाली आरोग्य केंद्राची 10 मार्च 2024 ला निर्मिती करण्यात आली. याठिकाणी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. साधना गोंड 19 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत आहेत, तर बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ऋषिकेश घनोकार हे 28 मे 2025 पासून सेवेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
केंद्रातील काही पॅरामेडिकल कर्मचारी बाह्यस्त्रोत पद्धतीने नियुक्त करण्यात आले असून हे कर्मचारी वर्टस हॅास्पिटॅलिटी प्रा.लि. या कंपनीमार्फत कार्यरत आहेत. यामध्ये आरोग्य सहाय्यक जी.एच. राठोड, औषध निर्माण अधिकारी ऋषिकेश यादगीरे, लिपिक किशोर कराळे तसेच शिपाई आकाश महाले, रवी मुझाल्दा, छगन माळी, सपना झाल्टे यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी 11 ऑगस्ट 2025 पासून सेवेत असल्याची नोंद चौकशीत आढळून आली.
16 डिसेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचाल रजिस्टरची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना गोंड व आरोग्य सहायक जी.एच. राठोड हे आलेवाडी येथे लसीकरण सत्रासाठी गेल्याचे दिसून आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केले. तसेच सकाळची ओपीडी पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश घनोकार व इतर कर्मचारी केंद्रातून निघून गेले होते. मात्र, शिपाई आकाश महाले व रवी मुझाल्दा हे केंद्रावर उपस्थित असल्याची नोंद आहे.
जाळलेल्या औषधींचा तपशील
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाराची पाहणी केली असता मुदत संपलेल्या औषधी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले.
चौकशीदरम्यान औषध निर्माण अधिकारी ऋषिकेश यादगीरे व पुरुष शिपाई छगन माळी यांनी कोणालाही पूर्वकल्पना न देता तसेच शासनाने ठरवून दिलेल्या विहित प्रक्रियेचे पालन न करता ही औषधे जाळल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

.http://♦सखोल चौकशी करणार या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध व्यवस्थापन व विल्हेवाटीबाबत स्पष्ट सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close