सावन वानखडे यांचा आंदोलनाचा चौथा दिवस उजाडला तरी एकही संबंधित अधिकारी फिराकला नाही
45 वर्षापुर्वी प्रलंबित प्रश्न कोणाच्या दबावाखाली करण्यात आला नसल्याने सावन वानखडे यांच्यावर आल्ली उपोषणाची वेळ

सतिशकुमार वानखडे (सोनाळा प्रतिनिधी ):
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पंचशील नगरमधील रहिवाशांच्या घरकुल व जागेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला चार दिवस पूर्ण झाले असूनही शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.महाराष्ट्र शासनाने मार्च २०२६ मध्ये सन २०११ पूर्वी अस्तित्वात असलेल्या पात्र अतिक्रमणांचे नियमानुकूलकरण करण्याबाबत शासन निर्णय जारी केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सोनाळा येथील पंचशील नगरमधील पात्र रहिवाशांच्या प्रकरणात अद्याप कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पंचशील नगरवासीयांनी प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शासन निर्णयानुसार पात्र अतिक्रमणांचे तात्काळ नियमानुकूलकरण करणे, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना घरकुल मंजूर करणे, अपात्र लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत पुनर्वसन करणे तसेच सोनाळा-अकोट मार्गाची हद्द निश्चित करून शासकीय जमिनीचे मोजमाप करून जागांचे कायदेशीर नियमन करणे या मागण्यांचा समावेश आहे.या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालय सोनाळा येथे 23 जूनपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 24 जून रोजी मुंडण आंदोलन करण्यात आले, तर 25 जून रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून सरणावर झोपून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप पंचशील नगरवासीयांनी केला आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.



