क्राइम

सोनाळा पोलीसाची जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई

सोगोडा शिवारात जुगार अड्ड्यावर सोनाळा पोलिसांचा धडक छापा; ९ जुगाऱ्यांना ताब्यात, ₹११,३८० चा मुद्देमाल जप्त

 

सतिश व्ही वानखडे

सोनाळा (प्रतिनिधी):

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोगोडा शेतशिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सोनाळा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ९ जणांना ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या कारवाईत ताश पत्ते व रोख रक्कम असा एकूण ₹११,३८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोगोडा शेतशिवारात काही व्यक्ती बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याची माहिती सोनाळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने पथक तयार करत घटनास्थळी धाड टाकली. अचानक झालेल्या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळावरून ९ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ताश पत्ते आणि ₹११,३८० रोख रक्कम जप्त केली.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस स्टेशन सोनाळाचे ठाणेदार श्री. संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद शिंबरे, रमेश खरात, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार, गणेश मोरखडे, विकास सावळे आणि आकाशदीप वानखडे यांनी संयुक्तपणे केली.

सोनाळा पोलीस स्टेशनकडून परिसरातील बेकायदेशीर धंदे, जुगार, अवैध कृत्ये आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रकारांवर सातत्याने कठोर कारवाई सुरू असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close