रिमोट वाले बाबांचा चमत्कार! गाव चालतं ग्रामपंचायतीतून की रिमोट कंट्रोलमधून?
बोलो मेरे रिमोट वाले आका अब क्या हुंकूम है..

सतिशकुमार वानखडे
सोनाळा (प्रतिनिधी) : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका आदिवासीबहुल गावात सध्या एक अनोखी चर्चा रंगली आहे. गावातील लोकप्रतिनिधी, कर्मचारी, ठेकेदार आणि नागरिक यांच्यापेक्षा “रिमोट वाले बाबा” हेच अधिक प्रभावशाली असल्याची चर्चा चौकाचौकात ऐकायला मिळत आहे.
गावातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी फाईल कार्यालयात न जाता आधी रिमोटच्या बटणावर जाते. “ऑन” बटण दाबलं की काम मंजूर आणि “म्यूट” बटण दाबलं की नागरिकांच्या तक्रारी शांत, अशी व्यवस्था असल्याचे विनोदी स्वरूपात बोलले जात आहे.
गावातील एका ज्येष्ठ नागरिकाने गंमतीने सांगितले की, “पूर्वी ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य निर्णय घ्यायचे. आता रिमोट कंट्रोलच निर्णय घेतो की काय, अशी शंका यायला लागली आहे.”
दरम्यान, गावात अशीही चर्चा आहे की कोणाला काम द्यायचे, कोणाचा ठेका मंजूर करायचा, कोणाची शिफारस करायची आणि कोणाची फाईल थांबवायची याचे अंतिम नियंत्रण एका अदृश्य रिमोटकडे आहे. त्यामुळे अनेकांना आता शासनाच्या नियमांपेक्षा रिमोटची बॅटरी किती चार्ज आहे, याची जास्त काळजी वाटू लागली आहे.
पाणीपुरवठा उशिरा झाला तर लोक म्हणतात, “बहुतेक रिमोटचा सिग्नल गेला असेल.” रस्त्याचे काम रखडले तर उत्तर मिळते, “कंट्रोल दुसऱ्या चॅनलवर गेले असावे.” तर नागरिकांच्या तक्रारींवर काही कारवाई झाली नाही तर “रिमोट सायलेंट मोडवर आहे” अशी विनोदी चर्चा गावभर सुरू असते.
विशेष म्हणजे गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी रिमोटवरील पकड मात्र कमी होऊ नये, अशी काहींची मानसिकता असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे गावातील विकासकामांपेक्षा रिमोटच्या रेंजचीच जास्त चर्चा रंगताना दिसते.
सध्या तालुकाभर एकच प्रश्न विचारला जात आहे – “हा रिमोट नेमका कोणाच्या हातात आहे?” मात्र या प्रश्नाचे उत्तर अजूनही ‘सीक्रेट सेटिंग’मध्ये असल्याने नागरिक उत्सुकतेने पुढील अपडेटची वाट पाहत आहेत.
(ही बातमी व्यंगात्मक शैलीतील आहे व सर्व सूत्राच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहेत )



