बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करताच कुत्र्यांनी घेतली झेप : बलिदान दिलं पण मालकाला वाचवललं !
बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू व दुसरा कुत्रा जखमी

सतीशकुमार वानखडे
उडणगाव :- शेतात काम करत असलेल्या तरुणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली मात्र याचं वेळी शेतकऱ्याच्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे तरुण सावध झाला . त्याचे लक्ष बिबट्याकडे गेले आणि सुदैवाने तो बचावला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात एक कुत्रा मारल्या गेला तर दुसरा जखमी झाला या घटनेने उडणगाव शिवारात एकच खळबळ उडाली.
उडणगाव येथील शेतकरी निलेश महाजन यांच्या गट क्रमांक 770 मधील शेतात सकाळी सुनील नरवडे हा तरुण काम करत होता महाजन यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने सुनीलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्याचे कुत्रे बिबट्यावर धावून गेले त्यामुळे बिबट्याला आपला मोर्चा कुत्र्याच्या दिशेने वळवावा लागला आणि तरुण बचावला बिबट्याने एक कुत्रा जखमी केला तर दुसऱ्याला झाडावर घेऊन गेला तरुणाने आरडा-ओरडा करतच बिबट्याने धूम ठोकली त्यामुळे झाडावरील कुत्रा त्या खालील विहिरीत पडला आणि त्यात तो कुत्रा मरण पावला होता. या घटनेची सपूर्ण माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला दिली असता वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली . नागरिकांनी सावध राहण्याचे तसेच रात्रीच्या वेळी एकटे शेतात न जाण्याचे आव्हान अजिंठा वनविभागाने केले आहे.
तरुणाची आपबिती….
केळीच्या बागेत ठिंबक सिंचनाचा कॉक फिरवण्यासाठी गेलो असता तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने माझ्यावर हल्ला केला या कडे माझे लक्ष नव्हते पण माझ्यासोबत असलेल्या कुत्र्याने जोर- जोरात भुकत बिबट्याच्या दिशेने झेप घेतली आणि मी सावध झालो . बिबट्या पाहून माझा अंगाचा थरका ऊडाला कुत्र्यामुळे माझ्या वरचे लक्ष हटले आणि मी वाचलो पण कुत्रा मरण पावला.
परिसरात बिबट्याची दहशत….
उडणगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तरुणावर झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या मना मध्ये भीती निर्माण झाली असून शेतात जाण्यास कोणीही धजावेना . वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी शेतकऱ्यांची मागणी केली जात आहे


